मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला. त्यावेळी एकच आक्रोश झाला.
प्राथमिक तपासात, आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. धारण एक महिन्यांपूर्वी दोघांचे वाद झाले होते. त्याचा राग या आरोपीच्या मनात होता. नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपील 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सदर प्रकरणी मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर केस ही फास्टट्रॅक कोर्टात नेऊन, सरकारी वकील उज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता नेमलं जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.
लासलगाव येथील सुवर्णकार समाजाचा मूक मोर्चा
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली यानंतर ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले. दरम्यान त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.